महिंद्र थार #१ – लिलावात मिळाली १.११ कोटी किंमत

फोटो साभार ऑटो कार

महिंद्राची नवी एसयूव्ही थार २०२० च्या पहिल्या युनिटला लिलावात १ कोटी ११ लाखांची बोली लागली असून ही रक्कम करोना महामारी नियंत्रण कार्यक्रमासाठी दान दिली जाणार आहे. दिल्लीचे आकाश मिंड यांनी लिलाव संपण्याच्या शेवटच्या मुदतीच्या वेळी सायंकाळी वरील बोली लावली. लिलाव बोलीची प्राथमिक रक्कम कंपनीला मिळणार असून बाकी रक्कम कोविड रिलीफ साठी काम करणाऱ्या नंदी फौंडेशन, स्वदेश फौंडेशन किंवा पीएम केअर फंड यापैकी कुठल्याही संस्थेला मिंड यांनी थेट पाठवायची आहे. तेवढीच रक्कम महिंद्र वरील तीन पैकी एका संस्थेला देणार आहे. मिंड यांना त्यांच्या आवडीच्या कलर मध्ये पहिली थार घेता येणार आहे.

महिंद्राने नवी एसयुव्ही १५ ऑगस्ट रोजी सादर केली होती आणि २ ऑक्टोबरला लाँचिंग केली जाणार आहे. त्यापूर्वी पाहिले युनिट लिलावात ठेवले गेले होते. त्याप्रमाणे २४ सप्टेंबर पासून हा लिलाव कंपनीच्या अधिकृत ऑनलाईन वेबसाईटवर सुरु झाला. प्रथम लिलावाची मुदत तीन दिवस होती पण नंतर ती आणखी दोन दिवस वाढविली गेली. त्यानुसार २९ सप्टेंबरला हा लिलाव संपला. पहिल्या दिवशीच या एसयुव्हीला ८० लाखांची बोली लागली होती. शेवटच्या दिवशी सकाळी ही बोली ९२ लाखांवर गेली आणि दिवस संपताना मिंड यांनी १ कोटी ११ लाखची बोली लावून एसयूव्ही घेतली.

या प्रक्रियेत ५४०० जणांनी बोली लावली होती. लिलाव २५ लाखांपासून सुरु झाला आणि २५ हजाराच्या पटीत किंमत वाढविता येणार होती. या एसयूव्हीची प्रत्यक्षातली किंमत १० ते १४ लाख दरम्यान असेल असे समजते. डिझेल आणि पेट्रोल दोन्ही प्रकारात ती ग्राहकांना मिळणार आहे.