करोना लस बनविण्यासाठी ५ लाख शार्क जाणार बळी

जगभरात करोना विषाणू प्रतिबंधक लस बनविण्याची प्रक्रिया सुरु असताना वन्यजीव तज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. डेली मेल मध्ये या संदर्भात आलेल्या बातमीनुसार करोना लसीचे दोन डोस जगभरातील नागरिकांना द्यायचे असतील तर त्यासाठी किमान ५ लाख शार्क मारावे लागणार आहेत. त्यामुळे शार्क जातीचे मासे नामशेष होण्याची भीती वन्यजीव तज्ञ व्यक्त करत आहेत.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील शार्क अलाईज संस्था शार्क माशांच्या संरक्षणासाठी काम करते. तेथील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार करोन लस तयार करताना स्क्वालीन नावाचा पदार्थ वापरला जाणार आहे. हा पदार्थ नैसर्गिक स्वरुपात शार्कच्या यकृतात तेल स्वरुपात मिळतो. स्क्वालीन औषधातील सहाय्यक पदार्थ आहे आणि तो रोगप्रतिकार शक्ती मजबूत बनवून लस अधिक प्रभावी करणारा आहे. या तज्ञांच्या मते जगभरातील नागरिकांना करोना लसीचा एक डोस द्यायचा असेल तर अडीच लाख शार्क मारावे लागतील.

लस बनविण्यासाठी इतके शार्क मारले गेले तर निसर्गाचा समतोल बिघडेल. शिवाय बनलेली लस किती प्रभावी ठरणार याची काहीच खात्री आत्ता देता येत नाही. ब्रिटीश फार्मा कंपनी ग्लॅक्सोथक्लाईन कडून मिळालेल्या माहितीनुसार फ्ल्यू लस बनविण्यासाठी सुद्धा स्क्वालीनचा वापर केला जातो आणि तीन हजार शार्क मारल्यावर त्यातून १ टन स्क्वालीन तेल मिळते. दरवर्षी लस उत्पादनासाठी ३० लाख शार्क मारले जातात. या तेलाचा उपयोग सौंदर्यप्रसाधने व मशीन मधील वंगण यासाठी सुद्धा केला जातो.