रिलायन्सला टक्कर देणार टाटाचे ‘सुपर अ‍ॅप’, वॉलमार्ट 1.8 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची शक्यता

भारतातील ऑनलाईन रिटेल क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये परदेशी कंपनीची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता टाटा समूहाच्या सुपर अ‍ॅपमध्ये अमेरिकन कंपनी वॉलमार्ट इंक 25 बिलियन डॉलर्सची (जवळपास 1.8 लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू असून, सुपर अ‍ॅप हे टाटा आणि वॉलमार्टचे जॉइंट वेंचर म्हणून लाँच केले जाऊ शकते. यामुळे टाटा ई-कॉमर्स व्यवसाय आणि वॉलमार्टचे ई-कॉमर्स यूनिट, फ्लिपकार्टमध्ये ताळमेळ येईल.

याआधी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक, गुगल, केकेआर अँड कंपनी आणि सिल्वर लेक सारख्या कंपनीच्या गुंतवणुकीद्वारे 20 बिलियन डॉलर्स जमवले आहेत. यानंतर आता टाटा समुहाच्या वेंचरमध्ये देखील परदेशी कंपनी गुंतवणूक करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, टाटा समूह आपल्या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्ममधील हिस्सेदारी विकण्यासाठी इतर गुंतवणूकदारांशी देखील चर्चा करत आहे. टाटाचे सुपर अ‍ॅप हे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्लॅटफॉर्मवर टाटाचे अनेक इतर सुविधा देखील उपलब्ध असतील. याआधी वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील 66 टक्के हिस्सेदारीदारी देखील खरेदी केलेली आहे.