नेपाळची वळवळ सुरूच, आता कालापानीजवळ उभारत आहे बॅरक

नेपाळ उत्तराखंडच्या कालापानी जवळील भागात आपल्या सीमेत सैनिकांसाठी स्थायी क्वॉर्टर आणि बॅरक (सैन्य इमारत) बनवत आहे. नेपाळ वारंवार उत्तराखंडमधील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर दावा ठोकत आला आहे. नेपाळचे हे पाऊल आश्चर्यकारक आहे कारण याआधी नेपाळने कधीही या भागात सैनिक तैनात केलेले नाहीत. हे बॅरक कालापानीपासून 13 किमी लांब चंगरू येथे उभारले जात आहेत.

मागील काही महिन्यांपासून भारत-नेपाळमध्ये काही भागांवरून तणाव आहे. नेपाळने कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भारतीय प्रदेशाला आपले दर्शवत नवीन राजकीय नकाशा जारी केला होता. हे तिन्ही भाग उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात येतात हे भारताने अनेकदा स्पष्ट केले आहे. नेपाळचे गृहमंत्री राम बहादुर थापा यांनी शुक्रवारी चंगरूमध्ये बॅरक आणि क्वार्टरची पायाभरणी केली. या बॅरकमध्ये नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलातील जवान राहतील.

आज तकच्या वृत्तानुसार, थापा चंगरूच्या जवळील सीतापूल येथील लोकांशी बोलताना म्हणाले की, नेपाळच्या युवकांसाठी आर्म्ड पोलीस फोर्समध्ये सहभागी होण्याची चांगली संधी आहे. कारण आर्म्ड पोलीस फोर्स विस्तार करण्याची योजना बनवत आहे. आर्म्ड पोलीस फोर्सचे प्रवक्ता राजू आर्यल म्हणाले की, आम्ही भारत-नेपाळ सीमेवर देखरेखेसाठी चंगरुमध्ये बॅरक उभारत आहोत.