भारताने फेटाळला लद्दाखमधील एलएसीबाबतचा चीनचा दावा

लद्दाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेबाबाबतच (एलएसी) चीनचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, भारताने कधीही चीनने 1959 एकतर्फी ठरवलेल्या एलएसीला मान्य केलेले नाही. 1993 नंतर असे अनेक करार झाले आहेत, ज्याचा उद्देश अंतिम करारापर्यंत सीमेवर शांती आणि सुस्थिती कायम ठेवणे हा होता.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, 2003 पर्यंत दोन्ही बाजूकडून एलएसी ठरविण्याच्या दृष्टीने पर्यत्न होत होते. मात्र त्यानंतर चीनने रस दाखवणे बंद केल्यावर ही प्रक्रिया थांबली. मागील काही महिन्यात चीन एकतर्फी एलएसीचे अलायमेंट बदलण्याच्या तयारीत आहे.

10 सप्टेंबरला परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत चीनने देखील आतापर्यंतचे करार स्विकारण्याचा विश्वास दर्शवला होता. भारताला आशा आहे की चीन करार आणि सहमतीवर कायम राहिल व एलएसी बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न करणार नाही.

दरम्यान, भारतीय सैन्य पुर्व लद्दाखच्या उंचीवरील भागात हिवाळा पाहता दारूगोळा, शस्त्रसाठा आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत आहे. 16000 फूट उंचीवर असलेल्या सैन्यदलासाठी मोठ्या प्रमाणात कपडे, तंबू, खाद्यपदार्थ, संप्रेषण उपकरणे, इंधन, हीटर आणि इतर वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.