ट्रॅक्टर जाळून शेतकऱ्यांचा अपमान केला, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला संताप


कृषी विधेयकाविरोधात पंजाबसह विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहे. काँग्रेससह विरोधीपक्ष देखील या विधेयकांवरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. या विधेयकांच्या विरोधात पंजाब यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टर जाळत विरोध प्रदर्शन केले होते. या घटनेबाबत आता पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त करत हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार देत आहे, तरी देखील हे लोक विरोध करत आहेत. देशातील शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात आपले उत्पन्न विकू नये, अशी यांची इच्छा आहे. ज्या सामानांची, उपकरणांची शेतकरी पूजा करतो, त्यांनाच पेटवून हे लोक आता शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत.

उत्तराखंडमधील विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना मोदी म्हणाले की, देशातील शेतकरी, कामगार आणि आरोग्यासंबंधी मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे देशातील कामगार सशक्त होतील, देशातील तरुणांचे सशक्तीकरण होईल, देशातील महिला सशक्त होतील, देशातील शेतकरी सशक्त होतील, पण काही लोक केवळ विरोध म्हणून कसे आंदोलन करीत आहेत हे आज देश पहात आहे.

सर्जिकल स्ट्राईक, राम मंदिर भूमिपूजन, आंतरराष्ट्रीय योगदिवस आणि स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा देखील हे लोक विरोध करत होते, असे म्हणत मोदींनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला.