हैद्राबादमध्ये बनतेय उत्तराखंड प्रमाणे बद्रीनाथ धाम

फोटो साभार भास्कर

उत्तराखंड राज्यातील जनतेचे आराध्य दैवत बद्रीनाथ आता हैद्राबाद येथेही दर्शन देणार आहे. उत्तराखंड मधून रोजगारासाठी तेलंगाना येथे आलेल्या ६ हजार कुटुंबानी उत्तराखंड मधील बद्रीनाथ धाम प्रमाणेच हैद्राबाद येथे बद्रीनाथ धाम साकारण्यासाठी दान दिले असून त्यातून नवे बद्रीनाथ धाम बांधले जात आहे. पुढील वर्षात ते भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. वास्तविक या वर्षातच या मंदिराचे काम पूर्ण केले जाणार होते मात्र करोना मुळे लॉकडाऊन लागला आणि मंदिराचे काम होऊ शकले नाही असे समजते. मंदिराचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुन्हा सुरु झाले आहे.

या मंदिर संकुलासाठी ६० लाख रुपये खर्च येणार आहे. ६७५० मीटर जागेत हे मंदिर संकुल बांधले जात आहे. मंदिराची उंची ५० फुट असून ते दोन मजली असेल. तळमजल्यावर भव्य हॉल आहे आणि पहिल्या मजल्यावर बद्रीनाथ पंचायतन आहे. यात योगमुद्रेतील बद्रीनाथ, गणेश, कुबेर, बलराम, लक्ष्मी, नरनारायण, नारद आणि गरुड यांच्या मूर्ती असतील. नवग्रह, गणेश आणि लक्ष्मी यांची वेगळी मंदिरे उभारली जाणार आहेत.

या परिसरात ७२०० चौरस फुटांचा कम्युनिटी हॉल बांधला जात आहे. राजेंद्र प्रसाद दोभाल यांनी दान दिलेल्या जागेत गोशाला आणि मंदिर कर्मचारी निवासस्थाने आहेत. उत्तराखंड येथील बद्रीधाम दर हिवाळ्यात भाविकांना दर्शनासाठी बंद केले जाते. मात्र येथील बद्रीधाम मध्ये भाविक वर्षभर दर्शन घेऊ शकणार आहेत. मंदिराची वास्तू रचना रोशनसिंग नेगी आणि बलवीर प्रसाद यांनी केली असून ते दोघे निवृत्त सैनिक आहेत. उत्तराखंड बद्रीधाम प्रमाणे येथेही वर्षभर सर्व उत्सव साजरे केले जाणार आहेत.