बऱ्याच काळानंतर येतोय एचटीसीचा फोल्डेबल स्मार्टफोन

फोटो साभार नवभारत टाईम्स

काही वर्षापूर्वी स्मार्टफोन बाजारात लोकप्रिय असलेली एचटीसी कंपनी पुन्हा एकदा नव्याने बाजारात उतरण्यास सज्ज झाली आहे. एचटीसीच्या चाहत्यांसाठी ही खास बातमी असून कंपनी लवकरच वेगळाच फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणत आहे. लेट्स गो डिजिटलच्या रिपोर्ट नुसार नव्या फोनसाठी कंपनीने पेटंट मिळविले आहे. या फोन डिझाईनसाठी कंपनीने २०१९ मध्ये पेटंट दाखल केले होते आणि ऑगस्ट २०२० मध्ये या पेटंटला मान्यता मिळाली असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.

लेट्स गो डिजिटलने या पेटंट संदर्भातले डीटेल्स दिले आहेत तसेच एक इमेज तयार केली आहे ज्यात या फोन मधील फोल्डिंग मेकॅनीझम असे काम करेल याचा अंदाज दिला गेला आहे. आज घडीला बाजारात जे फोल्डेबल स्मार्टफोन आहेत त्यापेक्षा या फोनचे डिझाईन वेगळे आहे. आजपर्यंत आलेल्या सर्व फोल्डेबल फोनचा स्क्रीन आतल्या बाजूला फोल्ड होणारा आहे पण एचटीसीचा फोन बाहेरच्या बाजूला फोल्ड होईल. यामुळे फोल्ड स्थितीत सुद्धा फोनचा डिस्प्ले बाहेरच्या बाजूला राहील आणि त्यामुळे सेकंडरी डिस्प्लेची गरज राहणार नाही.

ज्या डिझाईनसाठी पेटंट घेतले गेले आहे ते डिझाईन आकर्षक दिसते आहे आणि फोल्डेबल मेकॅनीझम सुद्धा मजबूत वाटते आहे. एचटीसी त्यांची अनेक फ्लॅगशिप डिव्हायसेस लाँच करणार असून त्यावर काम सुरु असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचा फोल्डेबल फोन पुढील वर्षात बाजारात येईल असे संकेत दिले जात आहेत.