प्रथमच महिला अंतराळवीर अंतराळातून करणार मतदान

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सध्या प्रचाराची रणधुमाळी माजली आहे. नासा मधील महिला अंतराळवीर ४१ वर्षीय कॅथरीन रुबिंस हिच्यासाठी मात्र या निवडणूक मतदानाचा अनुभव यावर्षी वेगळा असणार आहे. कारण कॅथरीन ऑक्टोबरच्या मध्याला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठी अवकाशात उड्डाण घेणार आहे. आणि विशेष म्हणजे जबाबदार नागरिक आणि लोकशाहीत महिला भागीदारी राखण्यासाठी ती अंतराळ स्टेशन मधूनच तिचा मतदानाचा हक्क बजावणार आहे. अंतराळातून मतदान करणारी कॅथरीन ही बहुदा पहिलीच महिला अंतराळवीर आहे.

कॅथरीन सध्या रशियाच्या युरी गार्गीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे. यापूर्वी तिने ७ जुलै २०१६ मध्ये प्रथम अंतराळात झेप घेऊन स्पेस स्टेशनवर ११५ दिवस मुक्काम केला होता. आता ती दुसऱ्या वेळी अंतराळ प्रवासाला जात आहे. ती म्हणते मी माझ्या मायदेशापासून दूर आहे पण तंत्रज्ञान आणि सुरक्षित नेटवर्क यामुळे मतदानात सामील होऊ शकणार आहे. कॅथरीन ३२२ किमी उंचीवरून मतदान करेल आणि नासा हे मतदान गुप्त राहील याची काळजी घेईल असे समजते. कॅथरीन या प्रवासात सहा महिने स्पेस स्टेशनवर राहणार आहे.

अमेरिकेच्या टेक्सास भागात बहुतेक अंतराळवीरांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे त्यांना शक्य नसेल तर मतदानाला अनुपस्थित राहूनही मतदानाचा हक्क बजावण्याची सोय केली गेली आहे.