आमदार निवासात बॉम्ब अफवेने धावपळ

फोटो साभार नवभारत टाईम्स

मुंबईतील मंत्रालयाजवळ असलेल्या आमदार निवासात सोमवारी रात्री आलेल्या एका अज्ञात फोनमुळे पोलीस आणि संरक्षक विभागाची चांगलीच धावपळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आमदार निवासात बॉम्ब ठेवला असल्याचा आणि पाच मिनिटात त्याचा स्फोट होणार असल्याचा फोन एका अज्ञात नंबरवरून आला. त्यामुळे पोलीस विभागाची धावपळ झाली आणि त्वरीत आमदार निवास खाली करण्यात आले.

त्यानंतर बॉम्बशोधक पथक व श्वान पथक बोलावून आमदार निवासाच्या कान्याकोपऱ्याची तपासणी करण्यात आली. अखेर रात्री अडीचच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याची अफवा होती असे उघडकीस आले. या आमदार निवासात १५० लोक राहतात. ज्या नम्बरवरून फोन आला त्या फोनचा तपास सुरु झाला असून काही धागेदोरे मिळाले असल्याचे समजते.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी दोन वेळा आली होती त्यामुळे कोणताही धमकीचा फोन आला तरी त्याची गंभीर दखल घेतली जात असल्याचे पोलीस विभागाकडून सांगितले गेले आहे.