थरूर यांनी संजू सॅमसनची केली धोनीशी तुलना, गंभीरने दिले उत्तर

आयपीएल 2020 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या संजू सॅमसनचे सर्वचजण कौतुक करत आहे. दिग्गज क्रिकेटपटूंच्या नंतर आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी देखील सॅमसनचे कौतुक करत त्याची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीशी केली. मात्र सॅमसनची धोनीशी तुलना करणे भाजप खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला आवडले नाही व त्यांनी थरूर यांच्यावर निशाणा साधला.

संजू सॅमसनने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात दोन अर्धशतक ठोकली आहेत. कालच्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात देखील त्याने 85 धावांची खेळी केली. राजस्थानच्या विजयात सॅमसनचा महत्त्वाचा वाटा होता.

संजूच्या पारीचे कौतुक करत थरूर यांनी ट्विट केले की, राजस्थान रॉयल्सने शानदार विजय मिळवला. मी संजू सॅमसनला एक दशकापासून ओळखतो व तो 14 वर्षांचा असताना मी त्याला म्हणालो होतो की तू एकेदिवशी पुढील धोनी असशील. तो दिवस आला आहे. आयपीएलमध्ये दोन शानदार पारी खेळल्यानंतर तुम्हाला माहिती पडले असेल जागतिक स्तरावरील खेळाडू आला आहे.

मात्र, थरूर यांनी संजूची धोनीशी केलेली तुलना गौतम गंभीरला फारशी आवडली नाही. थरूर यांना उत्तर देत गंभीरने लिहिले की, संजू सॅमसनला दुसरे कोणी बनण्याची अजिबात गरज नाही. तो भारतीय क्रिकेटचा संजू सॅमसन असेल.