तेवातियाची वादळी खेळी बघून युवराज देखील घाबरला, म्हणाला…

आयपीएलच्या काल खेळलेल्या सामन्यात अनेक विक्रम झाले. पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने 2 विकेट्स गमावत 223 धावांचा डोंगर रचला. मात्र एवढ्या धावा करून देखील पंजाबला हार सहन करावी लागेल, असे कोणालाच वाटले नव्हते. अशक्य वाटणारे हे लक्ष्य राहुल तेवातियाच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सहज पुर्ण केले.

तेवातियाने 18व्या ओव्हरमुळे तुफानी खेळी करत शेल्डन कॉट्रेलला 5 षटकार (6,6,6,6,0,6) खेचत, सामनाच फिरवला. एकवेळी अशक्य वाटणारे हे लक्ष्य संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि राहुल तेवातियाच्या जबरदस्त फलंदाजीमुळे सहज पुर्ण झाले. या सामन्यात सर्वात लक्षणीय खेळी राहुल तेवातियाची ठरली. एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार खेचणाऱ्या तेवातियाची खेळी बघून, युवराज पासून विरेंद्र सेहवागपर्यंत सर्वचजण हैराण झाले.

तेवातियाची ही खेळी बघून युवराज सिंह देखील हैराण झाला. त्याने ट्विट करत लिहिले की, मिस्टर राहुल तेवातिया, नाही भावा नाही… एक बॉलवर षटकार न मारल्याबद्दल धन्यवाद. अप्रतिम सामना. या शानदार विजयासाठी राजस्थान रॉयल्सचे अभिनंदन.

दरम्यान, कालच्या सामन्यात राहुल तेवातियाने 31 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली. तर पंजाबकडून मयंक अग्रवालने 50 बॉलमध्ये 106 धावांची शतकी खेळी केली.