राज्यात ऑक्टोबरमध्ये रेस्टॉरंट्स सुरु होणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

राज्यातील रेस्टोरेंट, बार लवकरच सुरू करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील रेस्टोरेंट सुरू होऊ शकतात. 17 ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या निमित्ताने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. रेस्टोरंट संघटना प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे संकेत दिले आहेत.

राज्य शासनाने रेस्टॉरेंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती संबंधितांना पाठविली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरेट सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणार असाल तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मी हॉटेल सुरु करण्यासाठी परवानगी देतो. मात्र, एकदा हॉटेल सुरु केल्यावर ते पुन्हा बंद करावे लागणार नाहीत, याची जबाबदारी हॉटेल मालक आणि चालकांवर असेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रेस्टोरेंट क्षेत्र बंद आहेत. 40 टक्के होम डिलिव्हरीच्या माध्यमातून टिकून आहेत. लॉकडाऊनमध्ये कर्मचारी देखील आपआपल्या गावी परतले आहेत. सरकारच्या रेस्टोरेंट सुरू करण्याच्या निर्णयामुळे जवळपास 60 लाख थेट कर्मचारी आणि 1.8 अप्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. याबाबतची नियमावली राज्य सरकार लवकरच जाहीर करणार आहे.