आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत. या व्हिडीओत ते आपल्या पत्नीला धमकावत त्यांच्या खाजगी गोष्टींमध्ये न येण्यास सांगत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण आता गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांपर्यंत पोहचले आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, त्यांच्या मुलाने या व्हिडीओसह गृहमंत्री, मुख्यसचिव आणि डीजीपीकडे तक्रार केली आहे. डीजीपी पुरुषोत्तम शर्मा यांनी आपण या व्हिडीओमध्ये असल्याचे आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. मात्र पुरुषोत्तम शर्मा यांना आपल्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे.

एडीजी उपेंद्र जैन म्हणाले की, अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार मिळालेली नाही. ज्या व्यक्तीने घटनेचा व्हिडीओ पाठवला आहे, त्या व्यक्तीचा दावा आहे की तो त्यांचा मुलगा आहे. मात्र या व्हिडीओची सत्यता अद्याप तपासणे बाकी आहे. मोबाईलवर पाठवलेल्या तक्रारीच्या आधारावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याला शर्मा यांच्या घरी पाठवण्यात आले होते, मात्र त्यांच्या पत्नीने तक्रार देण्यास नकार दिला.

आज तकनुसार, पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाचे कारण हे पोलीस अधिकाऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले संबंध आहे. यामुळे त्यांच्यात वाद झाला व शर्मा यांनी पत्नीला मारहाण केली. याआधी शर्मा यांचे नाव हनी ट्रॅप केसमध्ये देखील आलेले आहे.