कंगना-बीएमसी वाद : न्यायालयाने संजय राऊत यांना विचारले – हरामखोर कोणाला म्हणाला सांगा

अभिनेत्री कंगना राणावतच्या बेकायदेशीर ऑफिसवर कारवाई केल्याने तिने मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीविरोधात दावा ठोकला होता. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आज विवादित शब्द हरामखोर देखील गाजला. हा शब्द कोणासाठी वापरला ?, याचे उत्तर न्यायालयाने संजय राऊत यांच्याकडे मागितले आहे.

बीएमसीचे वकील न्यायालयात म्हणाले की, याचिका अशा प्रकारे सादर केली आहे की जसे व्यक्तीला सरकार आणि सत्ताधारी पक्षाविरूद्ध जाहीरपणे बोलल्याबद्दल त्रास दिला आहे. मात्र सत्य वेगळे आहे. हे एक असे प्रकरण आहे, जेथे याचिकाकर्त्याने बेकादेशीररित्या बांधकाम केले होते. बीएमसीच्या वकील म्हणाले की. कंगना 5 सप्टेंबरचे ट्विट देखील न्यायालयात सादर करावे, जेणेकरून त्या ट्विटमुळे कारवाई झाली आहे की नाही याचे टाइमिंग समजू शकेल.

कंगनाच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, कंगनाचे 30 ऑगस्टपर्यंतचे सर्व ट्विट सादर करण्यात आले आहेत. संजय राऊत यांची पुर्ण मुलाखत सापडली नाही. केवळ एक क्लिपच पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. पुर्ण व्हिडीओ ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंगनाच्या वकिलाने हरामखोर असा उल्लेख करत असलेला संजय राऊत यांचा व्हिडीओ देखील प्ले केला. यावर राऊत यांच्या वकिलाने, माझ्या क्लाइंटने कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नसल्याचे म्हणत, याबाबत उद्या प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे सांगितले.

ऑफिसवर केलेल्या कारवाईची 2 कोटी भरपाई देण्याबाबत कंगनाचे वकील म्हणाले की, जे नुकसान झाले त्याची संपुर्ण माहिती घेऊन या निर्णयावर आलो आहोत. न्यायालय स्वतः कोणालाही पाठवून याची पाहणी करू शकते. दरम्यान, आता न्यायालयात राऊत यांच्या हरामखोर वक्तव्य आणि त्या शब्दाचा अर्थ समजणाऱ्या अशा दोन्ही मुलाखतीच्या क्लिप सादर केल्या जाणार आहेत.