कृषी विधेयकांच्या विरोधात इंडिया गेटवर पेटवला ट्रक, 5 जण ताब्यात

कृषी विधेयकांना विरोध वाढताना दिसत असून, आता आंदोलन हिंसक होत चालले आहे. दिल्लीच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये येणाऱ्या इंडिया गेट जवळ ट्रॅक्टर पेटवून देण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून, हे सर्व पंजाबमधील नागरिक आहेत.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, या आरोपींचे नाव मनजोत सिंह, रमनदीप सिंह सिंधू, राहुल, साहिब आणि सुमित आहेत. या घटनेचा व्हिडीओ पंजाब काँग्रेस यूथच्या पेजवर लाईव्ह दाखवण्यात आला होता. त्यामुळे हे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनुसार, या 5 लोकांव्यतिरिक्त एका इनोव्हा कारला देखील जप्त करण्यात आले आहे. सकाळी 7.15 ते 7.30 दरम्यान 15 ते 20 लोक कृषी विधेयकाविरोधात इंडिया गेटजवळ जमा झाले होते. ते आपल्यासोबत एक जुना ट्रॅक्टर देखील घेऊन आले होते. त्यानंतर त्यांनी कृषी विधेयकाविरोधात घोषणाबाजी करत ट्रॅक्टर पेटवून दिला. युवकांच्या हातात शहीद भगत सिंह यांचा देखील फोटो होता.

दरम्यान, शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, 2020, अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा आणि शेतमाल हमी भाव करार आणि शेती सेवा (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, 2020 या विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे.