दावा; अब्जाधीश ट्रम्प यांनी भरला केवळ 55 हजार रुपये कर ?

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप, दाव्यांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ष 2016 मध्ये केवळ 750 डॉलर्स (55 हजार रुपये) कर भरल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकन वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाईम्सच्या एका वृत्तात याबाबत दावा केला आहे.

द न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीत 20 वर्षांपेक्षा अधिकच्या टॅक्स रिटर्नचा उल्लेख करण्यात आला आहे. ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवत असल्याने आता पुन्हा एकदा त्यांच्यावर हे आरोप केले जात आहेत. दावा करण्यात आला आहे की ट्रम्प यांनी व्हाइट हाउसच्या पहिल्या वर्षात 750 डॉलर्स भरले. मागील 15 वर्षातील 10 वर्षांमध्ये त्यांनी फेडरल कर भरलेला नाही. कारण त्यांच्या कमाईपेक्षा तोटा अधिक होता.

दुसरीकडे, राष्ट्रपती ट्रम्प यांनी या आरोपांना फेटाळले असून, त्यांनी ही फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींसाठी खाजगी आर्थिक व्यवहारांची माहिती देणे आवश्यक नसते. मात्र मागील अनेक राष्ट्रपतींनी स्वतःची आर्थिक माहिती सर्वांसमोर सादर केलेली आहे. ट्रम्प यांनी ही परंपरा मोडत, माहिती जाहिर करण्यास नकार दिला आहे. 2016 च्या निवडणुकीत देखील ट्रम्प यांचा टॅक्स रिटर्नचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. आता पुन्हा एकदा निवडणुकीमुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे.