स्वस्तिक गावाचे नाही बदलणार नाव

फोटो साभार श्रीहर्षम न्यूज

हिंदू धर्मात पवित्र चिन्ह मानले गेलेले स्वस्तिक शुभकार्यात आवर्जून रेखले जाते आणि त्याची पूजा केली जाते. मात्र स्वस्तिक नावाच्या गावाची बातमी अमेरिकेतील आहे. हे गाव १०० वर्षे जुने असून या गावाचे नाव बदलले जावे यासाठी केलेला अर्ज जनमत घेऊन रद्द केला गेला आहे. स्वस्तिक हे हिटलरच्या नाझी सेनेचे प्रतिक आहे म्हणून ते बदलावे असा अर्ज या गावातून प्रवास केलेल्या मायकल अल्केमो याने केला होता. त्याने या नावाविरोधांत फिर्याद दाखल केली व अखेर त्यावर १४ सप्टेंबरला व्होटिंग झाले. मात्र येथील रहिवाशांनी या नावाविरोधात एकही मत दिले नाही त्यामुळे गावाचे नाव बदलले जाणार नाही असे समजते.

झाले असे की न्युयॉर्क येथील पर्यटक मायकल या गावावरून जात होता तेव्हा त्याची नजर गावाच्या नावावर पडली. त्याच्या मते स्वस्तिक हे हिटलर नाझी सेनेचे प्रतिक आहे आणि त्यामागचा इतिहास भीषण असल्याने या गावाचे नाव बदलले गेले पाहिजे. त्याने तसा अर्ज आणि याचिका दाखल केली. १८०० सालच्या सुमारास हे गाव वसविले गेले होते. या गावातील मूळ रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार हे नाव संस्कृत भाषेतून घेतले गेले आहे आणि त्याचा अर्थ कल्याण असा होतो. यामुळे आमच्या पूर्वजांनी हे नाव ठरविले. हिटलरने नाझी सेनेसाठी हेच चिन्ह घेतले असले तरी हिंदू आणि बौध्द धर्मात हे पवित्र चिन्ह असून मंदिरे आणि घरातून ते आवर्जून रेखले जाते. त्यामुळे गावाचे नाव बदलले जाऊ नये.