बिग बी रिझर्व बँक जनजागृती मोहिमेसाठी देणार सेवा

फोटो साभार न्यूइंडियन टाईम्स

बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आता रिझर्व बँकेच्या ग्राहक जागरुकता मोहिमेशी जोडले गेले असून बँकग्राहकांना फसवणूक होण्यापासून कसा बचाव कराल याची माहिती देणार आहेत. आरबीआयच्या या सार्वजनिक जागृती मोहिमेतून ग्राहकांना बँक व्यवहार करताना सुरक्षितपणे कसे करावे याची माहिती दिली जात आहे. हे व्यवहार कसे करावे आणि ते करताना काय काळजी घ्यावी यासाठी आरबीआयने त्यांच्या मुख्य ट्विटर हँडल शिवाय आणखी एक ट्विटर हँडल ‘ आरबीआय से’ नावाने सुरु केले आहे.

रविवारी या हँडलवर अमिताभ बच्चन यांनी एक संदेश पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणतात, जागरूक राहण्यासाठी एक पैसाही खर्च येत नाही मात्र पुरेशी माहिती नसल्याने कष्टाचा पैसा लुटला जाण्याचा धोका असतो. गेल्या वर्षात आरबीआयने इंग्रजी, हिंदी शिवाय अन्य प्रादेशिक भाषांमधून सुद्धा ही मोहीम चालविली आहे आणि त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होत असल्याचे सांगितले जात आहे.

या संदेशांमधून वारंवार ग्राहकांना त्यांचे अधिकार आणि जबाबदारी विसरू नका असे सांगितले जात आहे. एप्रिलच्या सुरवातीला या नावाने फेसबुक पेज सुरु करण्यात आले. बिगबी नी लॉकडाऊन काळात डिजिटल बँकिंगचा प्रचार करून ग्राहकांना सुरक्षित राहा संदेश दिला होता. विशेष म्हणजे ट्विटरवर आरबीआय सर्वात लोकप्रिय केंद्रीय बँक असून तिचे फॉलोअर्स अमेरिकेच्या फेडरल व युरोपीय केंद्रीय बँकेपेक्षा अधिक आहेत. फेडरल बँकेच्या फॉलोअर्सची संख्या ६.६४ लाख, युरोप केंद्रीय बँकेच्या फॉलोअर्सची संख्या ५.८१ लाख तर रिझर्व्ह बँकेच्या फॉलोअर्सची संख्या ९.६६ लाख आहे.