पृथ्वी कक्षेत येत असलेला चिमुकला चंद्र म्हणजे हरविलेले रॉकेट

फोटो साभार नई दुनिया

अंतराळात साठलेल्या कचऱ्यामुळे पृथ्वीला धोका आल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळते. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या वैज्ञानिकांनी असाच आणखी एक धोका व्यक्त केला असून या धोका म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत येत असलेलला एक मिनी मून म्हणजे चिमुकला चंद्र असल्याचे म्हटले होते. मात्र हा मिनी मून म्हणजे १९६० साली सोडले गेलेले आणि स्फोट झाल्याने अंतराळात हरवलेले रॉकेट आहे असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

या मिनी मूनला २०२० एसओ असे नाव दिले गेले आहे. २० बाय ४५ फुट आकाराची ही वस्तू २७००० मैल अंतरावरून पृथ्वीजवळून जाणार आहे. मात्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते १ वर्ष पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. डॉ. पॉल चडास यांच्या म्हणण्यानुसार ही वस्तू कृत्रिम आहे. प्रत्यक्षात ते १९६० साली सोडलेले रॉकेट असावे. ते दीर्घ काळ बेपत्ता होते. एक वर्षभर ते सूर्याजवळ भटकत होते आणि ३१२५ किमी प्रतीतास या वेगाने पृथ्वीजवळ येत आहे. नोव्हेंबर मध्ये ते पृथ्वीच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल आणि डिसेंबर २०२० मध्ये पृथ्वीपासून ५० हजार किमीवर जाईल आणि २ फेब्रुवारी २०२१ मध्ये सव्वादोन लाख किमी दूर असेल.

या वस्तूबद्दल १७ सप्टेंबरला सर्वप्रथम माहिती मिळाली होती. ५० वर्षापूर्वी २० सप्टेंबर १९६० मध्ये सर्व्हायव्हर दोन मिशन राबविले गेले होते त्यावेळी हे रॉकेट अंतराळ यानाबरोबर पाठविले गेले होते. चंद्राची अधिक माहिती मिळविण्यासाठी हे मिशन होते. पण अंतराळ यानात स्फोट झाल्याने हे मिशन यशस्वी झाले नव्हते. तेव्हापासून हे रॉकेट भटकले होते. त्याचा काही भाग चंद्राशी टक्कर होऊन नष्ट झाला होता असेही सांगितले जात आहे.