पृथ्वीची अंतिम घटिका सांगणारे घड्याळ

फोटो साभार पत्रिका

पृथ्वीजवळ नक्की किती वेळ शिल्लक आहे आणि तिची घटिका कधी भरेल हे सांगणारे एक घड्याळ न्युयॉर्कच्या मॅनहटन येथील एका इमारतीवर बसविले गेले आहे. अॅस्ट्रॉनॉमीकल क्लॉक असे त्याचे नामकरण केले गेले असून हे घड्याळ गॅन गोलन आणि अँड्र्यू बोयार्ड या दोघा कलाकारांनी तयार केले आहे. हे घड्याळ काय सांगते हे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाने जाणून घ्यायला हवे असे त्यांचे म्हणणे आहे.

या घड्याळात दाखविलेली वेळ ७ वर्षे १०१ दिवस, १७ तास, २९ मिनिटे आणि २२ सेकंड अशी आहे. घड्याळ तयार करणाऱ्या वरील दोन कलाकारांच्या मते या काळात पृथ्वीवर कार्बनची पातळी इतकी वाढेल की ती नियंत्रित करणे अशक्य होणार आहे. निसर्गाचा आपण जो खेळखंडोबा केला आहे त्याचे भयानक परिमाण भोगावे लागणार आहेत. जगात मोठ्या प्रमाणावर पूर, जंगल वणवे, दुष्काळ, अवर्षण, विस्थापन घडून येईल आणि तापमान इतके वाढेल की अनेकांना पाणी दृष्टीस सुद्धा पडणार नाही. गोलनच्या मते हे क्लायमेट क्लॉक आहे. जगाला हे आकडे कळणे महत्वाचे आहे. आता ज्या स्थितीत पृथ्वी आहे त्यापेक्षा तिची अवस्था अधिक बिघडू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे असा इशारा त्यातून दिला गेला आहे.