नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानक नुतनीकरण, टाटा प्रोजेक्ट आघाडीवर

फोटो साभार मिड डे

देशाच्या संसदेचे नवे बांधकाम कंत्राट मिळविल्यानंतर टाटा प्रोजेक्टची नजर आता नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रल रेल्वेस्टेशन नुतनीकरण प्रकल्पांवर असल्याचे दिसत आहे. नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रल स्थानके नव्याने बांधण्याची तयारी सुरु झाली असून नवीन प्लान नुसार नवी दिल्ली स्टेशन परिसर व त्याच्या आसपासचा ५ लाख चौरस मीटर परिसर तसेच मुंबई सेंट्रल स्टेशन आणि त्याच्या आसपासचा २.६ लाख चौरस मीटर परिसर विकसित केला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी टाटा प्रोजेक्ट कंपनी सोबत अडाणी, जीएमआर, एन्करेज इन्फ्रास्ट्रक्चर, स्टेट ओन्ड रेल्वे कंपनी, एसएनएफसी कंपन्याची नावे समोर येत असली तरी प्रमुख दावेदार टाटा प्रोजेक्ट हेच आहेत. या प्रकल्पासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर आहे आणि २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करायचा आहे.

दिल्ली रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास डेस्टीनेशन स्टॉप बनविला जाणार आहे. रिटेल आउटलेट सोबत ऑफिस स्पेस, हॉस्पिटॅलिटी, पंचतारांकित हॉटेल्स, बजेट हॉटेल्स, सर्व्हिस अपार्टमेंट ३० एकर भागात बनविली जाणार आहेत. मुंबई सेंट्रलच्या आजूबाजूचा परिसर पर्यटन आणि व्यावसायिक दृष्ट्या विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना चांगला परतावा मिळणार असून ६० वर्षे सुट दिली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. या दोन्ही प्रकल्पांचा अंदाजित खर्च ६५०० कोटी रुपये आहे.