माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचे निधन


माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांचे आज पहाटे ६ वाजून ५५ मिनिटानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांना दि. २५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ‘मल्टीऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम’ या विकारासाठी आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

“जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल मोदींनी शोक व्यक्त केला.त्यांनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.”

भारतीय लष्करात कर्तव्य बजावल्यानंतर सिंग यांनी राजकारणात पदार्पण केले. भाजपच्या स्थापनेत सहभाग असलेल्या महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील ‘संकटमोचक’ अशी त्यांची प्रतिमा होती. परराष्ट्र, संरक्षण, भूपृष्ठ वाहतूक अशा महत्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी पार पडली. प्रत्यक्ष जीवनात अत्यंत अदबशीर असलेल्या सिंग यांची सभागृहातील भाषणे मात्र अत्यंत सडेतोस आणि आक्रमक असत.