मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले असले तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भेटीमुळे अस्वस्थ असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘मातोश्री’वर धाव घेतली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.या भेटीबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना या भेटीबाबत माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
फडणवीस. राऊत भेटीने राष्ट्रवादी, काँग्रेस अस्वस्थ : पवार, थोरात मातोश्रीवर
राऊत आणि फडणवीस यांच्यातील तब्बल २ तासांची भेट अराजकीय होती आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दै. सामना’च्या मुलाखतीसंदर्भात बोलणे झाल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले असून भाजपच्या प्रवक्त्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. शनिवारी सांताक्रूझ येथील तारांकीत हॉटेलमध्ये राऊत आणि फडणवीस यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
मात्र, राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत स्पष्टीकरण दिले. या भेटीने महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात कोणताही बदल घडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणाने त्यांचे सरकारमध्ये सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे समाधान झाले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळेच पवार आणि थोरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्री गाठल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे संजय निरुपम आणि राष्ट्रवादी नेते माजिद मेमन यांच्यासह अनेकांनी या भेटीबाबत शंका व्यक्त केली आहे.