.. तर दिव्यचक्षू कर्मचारी कामावर येणार कसे? न्यायालयाचा सवाल


मुंबई: दिव्यचक्षू कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी वाहनव्यवस्था केली आहे का? तशी केली नसेल तर ते कामावर येण्याची अपेक्षा कशी बाळगता, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला केला आहे.

लॉकडाउनच्या काळात महापालिकेच्या दिव्यचक्षू कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याची घोषणा करण्याऱ्या महापालिकेने नंतर घूमजाव करत ही सुट्टी ‘अनुज्ञेय’ असेल. कामावर न येणाऱ्या दिव्यचक्षू कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही. त्यांना कामावर येण्यास प्रतिबंध नाही, अशी भूमिका घेतली. त्या विरोधात ‘नॅशनल ब्लाईंड असोसिएशन’च्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

दिव्यचक्षू व्यक्तींना वाहनात चढण्यापासून ते आसनावर बसेपर्यंत इतरांची मदत लागते. कोरोना संसर्गामुळे लोक शारीरिक अंतर पाळून आहेत. त्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. अशावेळी त्यांना वेतनापासून वंचित ठेवणे अन्याय्य आहे, अशी बाजू संघटनेच्या वतीने मांडण्यात आली.

कर्मचाऱ्यांना बसची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकल उपलब्ध आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. केंद्र सरकारने जारी केलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचे वेतन न कापण्याच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यास महापालिका बांधील नाही, असा दावाही महापालिकेच्या वतीने केला. मात्र, न्यायालयाने त्याबाबत नाराजी व्यक्त करीत महापालिकेला धारेवर धरले.