आम्ही एकत्र केलेले भोजन ‘गोपनीय’: संजय राऊत


मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आपल्या भेटीत गोपनीय काही नव्हते. गोपनीय होते ते आम्ही एकत्र केले ते भोजन, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दै. सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दिली. ‘सामना’मधील मुलाखतीबाबत आपल्यात चर्चा झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘गुप्त’ बैठक म्हणायला आम्ही काय ‘बंकर’मध्ये भेटलो का, असा सवालही त्यांनी केला.

राऊत आणि फडणवीस यांच्यामध्ये दि. २६ रोजी झालेल्या बैठकीने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तब्बल २ तास झालेल्या या बैठकीला माध्यमांनी आपल्या बातम्यांमध्ये ‘गुप्त’ स्वरूप दिल्याने तर्क- वितर्क लढवले जाऊ लागले. मात्र, राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आपल्या बैठकीला गुप्त म्हणायला आम्ही काही ‘बंकरमध्ये भेटलो नाही. महाराष्ट्राला वैचारीक वाद-विवादांची परंपरा आहे. व्यक्तिगत वादांची नाही. आपले फडणवीसांशी शत्रुत्व नाही. सत्ताधारी विरोधी नेते एकमेकांना नेहेमीच भेटत असतात. भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना सत्तेत असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटत होतो आणि आता काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सत्तेत असतानाही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असेही ते म्हणाले.