पुणे: जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून जगभरात कोविड-१९ ची लस उपलब्ध करून देण्याची पंतप्रधान यांची ग्वाही देशासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या नियोजनामुळे देशातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहील, अशा शब्दात कोरोनावरील लस उत्पादनासाठी प्रयत्नशील असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे.
अदर पूनावाला यांच्याकडून पंतप्रधानांची प्रशंसा
मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेसमोर केलेल्या भाषणात मोदी यांनी कोरोनावरील लसीचे उत्पादन करून त्याचा जगभरात पुरवठा करण्याची भारताची क्षमता असल्याची ग्वाही दिली. महासाथीच्या आव्हानात्मक काळातही भारतीय औषध उत्पादकांनी जगभरात आवश्यक औषधांचा पुरवठा कायम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ट्विट करण्याच्या आदल्या दिवशीच (दि. 26) पूनावाला यांनी ट्विट करून, प्रत्येक भारतीयाला लस देण्यासाठी भारत सरकारकडे ८० हजार कोटी रूपये उपलब्ध आहेत का, असा सवाल केला होता. मात्र, आता त्यांनी पंतप्रधानांच्या नियोजनक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. जगाला लस उपलब्ध करून देण्याची मोदी यांची दूरदृष्टी अभिनंदनास पात्र आहे. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, असेही पूनावाला यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. मोदी यांच्या सुयोग्य नियोजनामुळे प्रत्येक भारतीयाला सुरक्षिततेची ग्वाही मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.