बिहार निवडणुकीसाठी मुंबईतून विषय पाठवू-संजय राऊत


मुंबई – बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर होताच राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीला गती आली असून तिच्यात आता मुंबईतून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेही रंग भरत आहेत. या निवडणुकीत बिहारातले काही विषय नसतील तर मुंबईतून काही विषय पार्सलने पाठवण्याची सोय करू असे संजय राऊत यांनी उपहासाने म्हटले आहे. चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपुत याच्या संशयास्पद आत्महत्येचा आणि तिच्या चौकशीचा संदर्भ राऊत यांच्या या विधानाला आहे कारण सुशांतसिंग हा मुळातला बिहारचा राहणारा होता. त्याचे प्रकरण आता वादग्रस्त आणि गुंतागुंतीचे झाले आहे.

सुशांतसिंगच्या आत्महत्येचा विषय निवडणुकीत उपस्थित करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. याचा संदर्भ घेऊन खासदार राऊत म्हणाले, बिहारची निवडणूक विकासाच्या, कायदा-सुव्यवस्थेच्या आणि सुशासनाच्या मुद्यांवर लढवली गेली पाहिजे पण हे प्रश्‍न संपले असतील काही मुद्दे आम्ही मुंबईतून पार्सलने पाठवू असे राऊत म्हणाले.

सुशांतसिंगच्या मृत्यूच्या तपासाच्या संबंाधात बिहारचे पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात वाद निर्माण झाला असून या प्रकरणाच्या तपासात मुंंबई पोलीस फारसे सहकार्य करीत नाहीत असा आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांनी केला होता. त्यातून या दोघांतला वाद चव्हाट्यावर आला होता. विशेष म्हणजे पांडे यांनी आता नोकरी सोडली असून ते राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शिवसेना बिहारच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता असून शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संबंधात काही निर्णय जाहीर करणार आहेत. असे राऊत म्हणाले. बिहारच्या निवडणुकीवर जातींचा मोठा पगडा असतो पण त्यांनी कृषि कायदा आणि कामगार कायदा या विषयावर निवडणूक लढवली पाहिजे असे राऊत म्हणाले.