२० लाख ठिपक्यातून साकारले श्रीराम

फोटो साभार नई दुनिया

झारखंड येथील युवा चित्रकार शाम दिवाकर यांनी कॅनव्हासवर २० लाख बिंदूमधून श्रीरामाची प्रतिमा साकारली आहे. बिंदूमधून ब्रह्माची निर्मिती झाली आणि ब्रह्म हे निराकार आहे. निराकारातून साकार समोर येते या कल्पनेतून ही अनोखी कलाकृती त्यांनी बनविली आहे. अयोध्येतील आंतरराष्ट्रीय श्रीराम कथा संग्रहालयात ही कलाकृती ठेवली जाणार आहे.

दिवाकर हे अयोध्या स्वदेश संस्थेचे सदस्य असून या संस्थेने त्यांना अगदी आगळीवेगळी राम प्रतिमा साकारण्यास सांगितले होते. दिवाकर यांनी काळ्या मार्कर पेनने हँडमेड कॅनव्हासवर ही प्रतिमा साकारली. त्यासाठी २८ दिवस दररोज ८० हजार ते १ लाख बिंदू किंवा ठिपके काढण्याचे काम त्यांनी दिवसात १० ते १२ तास राबून पूर्ण केले आणि असे २० लाख बिंदू काढून ते जोडून त्यातून श्रीरामाची प्रतिमा रेखली. त्यासाठी त्यांनी दोन बाय तीन फुटी कॅनवासचा वापर केला आहे.

दिवाकर सांगतात लहानपणापासून ते चित्रे काढतात पण त्यांनी चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. कला उदरभरणासाठी वापरायची नाही तर ती ईश्वरसाधनेचे माध्यम म्हणून वापरायची असते. २०१९ मध्ये दिवाकर याना राजा रविवर्मा पारितोषिक मिळाले आहे तसेच २०२० मध्ये अयोध्या कला महोत्सवात स्वदेशी भारत संस्थेने त्यांचा गौरव केला आहे. लॉकडाऊन मधील ५ महिन्यात त्यांनी देशातील ४८ ऑनलाईन स्पर्धेत भाग घेऊन त्या जिंकल्या आहेत. २० लाख बिंदू मधून साकारलेल्या श्रीराम प्रतिमेची नोंद हैद्राबादच्या हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये केली गेली आहे.