हिमालयातील अजंठा – ताबो बौध्द मठ

महाराष्ट्रातील अजंठा येथील गुहांमध्ये असलेली, शेकडो वर्षापूर्वीची चित्रे जागतिक वारसा यादीत सामील झाली असून त्यामुळे अजंठाचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर आले आहे. अजंठा लेण्याप्रमाणेच अतिसुंदर भित्तीचित्रे असलेल्या अति प्राचीन ताबो मठाची ओळख हिमालयातील अजंठा अशी आहे. हिमालयातील अजंठा म्हणून ओळख असलेला ताबो मठ १० हजार फुट उंचीवर असलेला सर्वात प्राचीन मठ आहे. हिमाचल मधील लाहोल स्पिती जिल्यात हा मठ असून तिबेटमधील थोलिंग गोम्पा नंतर हा दुसरा महत्वाचा पवित्र मठ मानला जातो.

या मठाची उभारणी ९९६ इसवी सन मध्ये लोचावा रीन्ग्चेन जन्गपो रत्नाभद्र या विद्वान भिक्षुने केली. या मठात ९ देवालये आहेत आणि त्यांच्या भिंतींवर अतिशय सुंदर अशी चित्रे रेखाटली गेली आहेत. यात बौद्धाचे जीवन रेखाटले गेले आहे. येथे अति प्राचीन बौध्द ग्रंथ आहेत तसेच पांडू लिपी सुद्धा मिळाली आहे.१९९६ मध्ये या मठाला १ हजार वर्षे पूर्ण झाली.

या मठाचे बांधकाम वाळू, माती आणि विटामध्ये केले गेले असले तरी भिंती मातीच्या आहेत. विशेष म्हणजे या भिंतीवर काढल्या गेलेल्या चित्राचे रंग आजही ताजे आहेत. त्यावर बर्फवृष्टी किंवा पावसाचा कोणताही परिणाम झालेला नाही. दर चार वर्षांनी येथे चाहर मेळा भरविला जातो.

या मठाच्या भिंतीवरील चित्रे देवदेवतांनी एका रात्रीत रेखाटली असे सांगितले जाते. त्यामुळे हा मठ म्हणजे दैवी आशीर्वाद मानला जातो. १९७५ मध्ये भूकंप झाला तेव्हा त्यानंतर एक नवीन प्रार्थना सभागृह बांधले गेले आहे. हा मठ भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो. त्याला युनेस्कोने जगातील वारसा यादीत स्थान दिले आहे.