मानवी मृतदेह पूर्णनष्ट करणारी इकोफ्रेंडली शवपेटिका तयार

 

फोटो साभार सीएनएन

नेदरलंडची कंपनी लूपने एक विशेष प्रकारची इकोफ्रेंडली शवपेटिका तयार केली असून तिचे नामकरण ‘लिव्हिंग कॉफीन’ असे केले आहे. या शवपेटीमध्ये मृतदेह पूर्णपणे विघटीत होऊन मातीत मिसळून जाईलच पण त्यामुळे झाडांना पोषक द्रव्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकणार आहे. त्यामुळे या शवपेटिका बायोडीग्रेडेबल बनल्या असल्याचा दावा केला जात आहे.

सर्वसाधारणपणे शवपेट्या लाकडापासून बनविल्या जातात. मात्र लिविंग कॉफीन बनविताना एका विशिष्ट फंगसचा वापर केला गेला आहे. या शवपेट्यांची किंमत १५०० युरो म्हणजे सव्वा लाख रुपये आहे. रॉयटरच्या बातमीनुसार या शवपेटीत दफन झालेला मृत माणूस त्याच्या मृत्यूनंतर हजारो झाडांना जीवनदान देऊ शकणार आहे. लूप कंपनीने या शवपेटीच्या बाहेरच्या भिंती अळंबीची जमिनीतील मुळे असतात त्या प्रकारे दिसणाऱ्या एका फंगस पासून बनविल्या आहेत. शवपेटीच्या आतमध्ये याचे एक लेअर दिले गेले आहे त्यामुळे मृतदेहाचे विघटन होण्याची प्रक्रिया जलद होते.

लूपचे प्रमुख बोब हेदिंस सांगतात, मायसिलीयम या फंगसचा वापर त्यासाठी केला गेला आहे. मायसिलीयम हे निसर्गातील सर्वात चांगले रिसायकल एजंट मानले जाते. या फंगसला सतत अन्न लागते आणि त्याचे रुपांतर झाडांना पोषक पदार्थात होते. अगदी विषारी पदार्थ सुद्धा हे फंगस उपयुक्त पदार्थात रुपांतरीत करू शकते. मृतदेह जमिनीत पुरले गेल्याने जमिनीची प्रदूषण पातळी वाढते. पण त्याऐवजी जर कमी वेळात त्याचे विघटन झाले तर झाडांसाठी ते फायद्याचे होते.

ही शवपेटी झाडाप्रमाणे वाढविली जाते. एक पेटी तयार होण्यासाठी ७ दिवस लागतात. पेटीच्या साच्यावर फंगस उगवून आले की ते बाहेर काढून सुकविले जाते. नंतर ही पेटी २०० किलो पर्यंत वजन पेलण्यास सक्षम बनते. मृतदेह पेटीत ठेवला गेला की ३०-४० दिवसात पाण्याशी संपर्क होऊन ते विरघळते. २-३ वर्षात संपूर्ण मृतदेह नष्ट होतो. पारंपारिक शवपेटीमधील मृतदेह संपूर्ण नष्ट होण्यास किमान २० वर्षे लागतात.