काच समजून उचललेला स्फटीक निघाला साडेनऊ कॅरेटचा हिरा


अर्कांसास/ वृत्तसंस्था

मित्रांसह भटकताना एका बँक व्यवस्थापकाला सापडलेला काचेचा तुकडा प्रत्यक्षात या ठिकणी सापडणाऱ्या आकाराने सर्वात मोठ्या हिऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला ९. ७ कॅरेटचा हिरा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अमेरिकेतील एका हिऱ्याच्या बंद झालेल्या खाणींची जमीन पर्यटन विभागाने विकत घेऊन त्याचे रूपांतर पर्यटन केंद्रात केले. ‘क्रेटर ऑफ डायमंड्स पब्लिक पार्क’ असे या ठिकाणचे नाव आहे. खान बंद झाली असली तरी या ठिकाणी अजूनही हिरे सापडतात. हे पार्क पर्यटकांसाठी सन १९७२ पासून खुले केल्यानंतरही या ठिकाणी अनेक दुर्मिळ हिरे आढळले आहेत.

या पार्कमध्ये एक बँक व्यवस्थापक केविन किनार्ड आपल्या मित्रांसह फिरण्यासाठी आला असता त्याला एका काचेचा तुकडा सापडला. तो चकचकीत आणि वैष्ट्यपूर्ण लंबवर्तुळाकृती असल्याने त्याने तो बॅगेत ठेवला. मात्र, पार्क व्यवस्थापनाला ताबद्दल माहिती देताच त्यांनी त्याची पाहणी केली आणि तो हिरा असल्याचे आढळून आले. पार्कमध्ये सापडलेल्या हिऱ्यांना तो शोधणाऱ्याचे नाव देण्याची येथील पद्धत आहे. त्यानुसार या हिऱ्याला ‘किनार्ड फ्रेंडशिप डायमंड’ असे नाव देण्यात आले. या पार्कमध्ये सर्वात मोठा १६.३७ कॅरेटचा हिरा सन १९७५ मध्ये सापडला आहे.