अंगकोर: भूसुरुंगांचा शोध घेऊन लाखो चौरस मीटर जमीन सुरक्षित करण्याच्या कामगिरीबद्दल कंबोडियाच्या ‘मगावा’ या उंदराचा इंग्लंडच्या ‘पीडीएसए’ संस्थेच्या वतीने एका आभासी (व्हर्च्युअल) कार्यक्रमात मानाचे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. लष्करी सेवेत नसलेल्या प्रशिक्षित प्राण्यांच्या शौर्यासाठी देण्यात येणारे हा सुवर्णपदक मिळविणारा मगावा हा पहिला उंदीर ठरला आहे.
…म्हणून उंदराने पटकावले सुवर्णपदक
आफ्रिकेत सुमारे ३ फूट लांबीचे महाकाय उंदीर आढळतात. त्यांची वास ओळखण्याची क्षमता अतितीव्र असते. या गुणांचा उपयोग करून घेऊन त्यांना प्रशिक्षित करण्यात येते. जमिनीखालील स्फोटके शोधण्यापासून ‘टीबी’चा रुग्ण ओळखण्यापर्यंत अनेक प्रकारची कामे हे उंदीर करतात.
स्फोटके शोधण्याचे काम करणाऱ्या उंदरांना ‘हिरो रॅट’ म्हणून संबोधण्यात येते. मगावा हा असा ७ वर्षाचा प्रशिक्षित हिरो रॅट आहे. त्याने पाच वर्षाच्या कारकिर्दीत आतापर्यंत ३९ भूसुरुंग आणि २८ अन्य प्रकारच्या स्फोटकांचा शोध घेतला आहे. त्याच्या कामगिरीमुळे १ लाख ४१ हजार चौरस मीटर जमीन सुरक्षित केली आहे. मगोवा केवळ अर्ध्या तासात टेनिस कोर्टाच्या आकाराएवढे क्षेत्र तपासू शकतो. मेटल डिटेक्टर आणि अन्य साधनांच्या साधनांनी एकादी जमीन तपासण्यासाठी माणसाला ४ दिवस लागतात.
निवृत्तीपर्यंत मगोवा आपले स्फोटके शोधण्याचे काम करत राहील आणि त्यानंतर त्याला आरामदायक आयुष्य जगण्याच्या सुविधा देण्यात येतील, असे पीडीएसएच्या वतीने सांगण्यात आले.