मुंबईच्या लोकलमध्ये ‘सोशल डिस्टन्स’चा बोजवारा?जाणून घेऊ ‘व्हायरल व्हिडीओ’मागची वस्तुस्थिती


मुंबई: ‘अनलॉक’च्या या टप्प्यावर अजूनही मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन्समधून सरसकट सर्व प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. असे असतानाही नेहेमीप्रमाणेच प्रवाशांनी खचाखच भरलेल्या, जीव गुदमरून टाकणाऱ्या लोकलच्या डब्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून मुंबईच्या लोकलमध्ये ‘सोशल डिस्टन्स’च्या नियमांचा बोजवारा उडाल्याची चर्चाही रंगली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असूनही लोकलच्या डब्यात गर्दी केलेल्या प्रवाशांच्या झुंडीला अनेकांनी उपदेशाचे डोस पाजले तर काहींनी शिव्यांची लाखोली वाहिली. मात्र, मुंबईकरांचे लोकलवर असलेले अवलंबित्व जाणून असणाऱ्या अनेकांनी मात्र त्या गर्दीबद्दल सहानुभूती व्यक्त केली. मुंबईत अनेकांना लोकलने प्रवास करणे अनिवार्य असल्यानेच संसर्गाच्या धोक्याची जाणीव असतानाही ते टाळता न येण्यामागील हतबलता पाहून अनेक जण हळहळले.

मात्र, हा व्हिडीओ व्हायरल होताच पश्चिम रेल्वेकडून त्याचे स्पष्टीकरण त्वरेने करण्यात आले. हा व्हिडीओ दि. २३ सप्टेंबरचा आहे. या दिवशी मुंबईत, विशेषतः पश्चिम उपनगरात पावसाने कहर केला होता. या २४ तासात या मोसमातील सर्वाधिक २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्या काळात रुळांमध्ये पाणी साचल्याने रेल्वेमार्ग विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. बोरिवलीच्या मार्गावरील लोकलच्या ५०० पैकी २६३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे ज्या लोकल धावत होत्या त्या लोकलमध्ये गर्दी होणे अनिवार्य होते, असे स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आले. मात्र, त्यानंतर रेल्वेकडून तातडीने पावले उचलून अधिकाधिक फेऱ्या सुरू करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात केल्याचा दावाही करण्यात आला आहे.