… तर निवडणुकीतील विजेता ठरण्यास लागणार काही महिने: ट्रम्प

अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मेलवर येणाऱ्या मतांच्या मोजणीबाबत होऊ शकणाऱ्या वादामुळे आणि विलंबामुळे नक्की विजेता कोण हे ठरण्यास काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे सांगत विद्यमान अध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलवरील मतदानाबाबत नाराजी पुन्हा व्यक्त केली आहे.

काही राज्यांमधील न्यायालयांनी मेलवर आलेली मते मतदानाच्या दिवसापर्यंत पाठवलेली असतील तर त्याची मोजणी त्यानंतरही करण्याची परवानगी दिली आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने मतदान केंद्रावर गर्दीत जाणे टाळून मेलवर मतदान करण्याचा पर्याय निम्म्याहून अधिक मतदार निवडतील, अशी शक्यता आहे. मात्र, ट्रम्प यांचा या मतदानपद्धतीला विरोध आहे. त्यासाठी त्यांच्या वतीने न्यायालयात दादही मागण्यात आली आहे.

मेलवर आली मते मोजत बसण्यापेक्षा निवडणुकीचा निकाल त्वरित जाणून घेणे आपण पसंत करू. मेलवर येणाऱ्या मतांची मोजणी आणि निकालाची महिनोनमहिने वाट बघण्यापेक्षा टीव्हीसमोर बसून त्याचा रात्री ‘आणि विजेता आहे….’ हे शब्द ऐकण्यात आपल्याला अधिक रस आहे, असे त्यांनी एका रॅलीला संबोधित करताना सांगितले. मतदानानंतर मी आघाडणीवर असेन आणि ते अजून मेलवर मतपत्रिका येत असल्याचा दावा करीत निकाल टांगणीला लावून ठेऊ शकतात, असेही ते म्हणाले.

निवडणुकीत आपला पराभव झाला तर शांततेत सत्तेचे हस्तांतरण होणार नाही. विजेता ठरविण्याची वेळ सर्वोच्च न्यायालयावरच येईल, असा इशारा ट्रम्प यांनी नुकताच दिला आहे.