केरळच्या त्रिशूरमध्ये राहणाऱ्या एका युवकाला मागील 6 महिन्यात तिसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालावेलिल साव्हियो जोसेफ (38) हा तरूण पोन्नक्करा येथे राहतो. या केसचे आरोग्य विभाग सविस्तर विश्लेषण करत आहे. साव्हियो ओमानमध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत सुपरवाइजर आहे. पहिल्यांदा कोरोना झाला त्यावेळी तो ओमानमध्येच होता.
धक्कादायक! 6 महिन्यात तिसऱ्यांदा कोरोनाची लागण, डॉक्टर देखील हैराण
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार साव्हियोने सांगितले की, माझा एक सहकारी चीनला गेला होता. तेथून तो कोरोना पॉजिटिव्ह होऊन परतला. त्यामुळे मला देखील मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली. छातीत दुखू लागल्यानंतर श्वास घेण्यास समस्या येऊ लागली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर 7 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला.
ओमानची स्थिती भारतापेक्षा अधिक खराब असल्याने साव्हियो जूनमध्ये देशात परतला. जुलैमध्ये त्याला पुन्हा कोरोनाची लागण झाली. त्याला त्रिसूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर 22 जूलेला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. 5 सप्टेंबरला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समजले व 11 तारखेला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.
मात्र दुसरीकडे आरोग्य विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, कदाचित हे रिइंफेक्शनचे प्रकरण असावे किंवा रिपोर्ट चुकीचा असावा. आरोग्य सचिव राजन एन खोबरागडे म्हणाले की, या प्रकारचे प्रकरण अद्याप कोठेच समोर आलेले नाही. त्यामुळे आरोग्य विभाग याचा सविस्तर अभ्यास करत आहे. साव्हियो यांनी वारंवार कोरोनाची लागण होत असल्याने त्यांच्या जिवनावर देखील याचा परिणाम झाला आहे. एप्रिलमध्ये त्यांच्या पत्नीने जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र अद्याप त्यांना साव्हियो यांनी पाहिलेले नाही.