बिहारमध्ये आमचेच सरकार येणार, लोकांना मोदीजींवर विश्वास – फडणवीस

निवडणूक आयोगाने आज बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहारमधील 243 विधानसभा मतदारसंघासाठी 3 टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये पुन्हा एनडीएचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात पहिल्यांदाच कोव्हिडच्या संकटात एवढ्या मोठ्या स्तरावर निवडणूका होत आहेत. बिहारमधील लोकांना मोदीजींवर विश्वास आहे. तसेच, नितीश कुमार आणि सुशील मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकांसाठी कामे केली आहेत. त्यामुळे आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकमतशी बोलताना फडणवीस म्हणाले की, बिहार निवडणुकीसाठी भाजपाने प्रभारी केले आहे. लोकांना असे वाटत आहे की, हा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश आणि महाराष्ट्रातून निरोप आहे. यापूर्वी अरुण जेटली आणि अनंत कुमार यांच्यासारखे नेते ही जबाबदारी सांभाळत होते. दोन-तीन वर्षांत आम्ही असे अनेक नेते गमावले. पक्ष आता नवी टीम तयार करत आहे. त्यादृष्टीनेच पक्षाने माझी निवड केली आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला बिहारमध्ये मतदान होईल. तर मतमोजणी 10 नोव्हेंबरला होणार आहे.