उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने चक्क ‘या’ देशाची मागितली माफी

उत्तर कोरियाच्या सैनिकांद्वारे दक्षिण कोरियाच्या नागरिकाची हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात ही घटना अपमानास्पद असल्याचे म्हणत उत्तर कोरियाच्या हुकुमशहा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाची माफी मागितली आहे. याबाबत दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

दक्षिण कोरियाने सांगितले होते की उत्तर कोरियाच्या सैनिकांनी त्यांच्या देशाच्या एका नागरिकाला गोळी घातली होती. अनेक तास समुद्रात चौकशी केल्यानंतर त्यांनी फिशरीज डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याला गोळी घातली होती व कोरोना व्हायरसपासून बचावासाठी त्याचे शव जाळले होते. मागील एक दशकात उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुह हून यांनी एक पत्र वाचत सांगितले की, किम जोंग उन यांनी कोरोना व्हायरसच्या संकटात राष्ट्रपती मून जे इन आणि दक्षिण कोरियाच्या लोकांची मदत करण्याऐवजी त्यांना निराश केल्याबद्दल माफी मागितली आहे.

ही घटना दुर्मिळ मानली जात आहे. कारण उत्तर कोरिया आणि खासकरून थेट किम जोंग उन यांनी माफी मागणे दुर्मिळ आहे. दोन्ही देशातील तणाव वाढत असताना, ही माफी मागण्यात आली आहे.