कृषी विधेयकाविरोधात देशभरातील शेतकरी उतरले रस्त्यावर, ‘भारत बंद’ची हाक


संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या कृषी विधेयकाविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. पंजाब-हरियाणामध्ये मागील अनेकदिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. भारतीय किसान युनियनसह विविध शेतकरी संघटना आज भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.

शेतकरी संघटनांना काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, अकाली दल, आप, टीएमसीसह अनेक राजकीय पक्षांनी समर्थन दिले आहे. पंजाबमध्ये कालपासूनच शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी करत आहेत. देशभरातील जवळपास 31 शेतकरी संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.

महाराष्ट्रातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील या विधेयकाला विरोध करत आहेत. पंजाब, हरियाणामध्ये खासकरून या विधेयकांना विरोध आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे आणि आंदोलन करताना सोशल डिस्टेंसिंग पाळावे.