दिग्गज गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन

दिग्गज गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे आज चेन्नईमधील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. मागील 2 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची माहिती दिली. ते 5 ऑगस्टपासून हॉस्पिटलमध्ये भरती होते.

त्यांच्या निधनाची माहिती समजताच एचडी देवेगौडा, शिव कुमार, हेमा मालिनी, सौदर्या रजनीकांत आणि एआर रहमानसह अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर आदरांजली वाहिली.

एसपी बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एक महिना उपचार घेतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली होती. मात्र ते व्हेंटिलेटरवरच होते. दोन दिवसांपुर्वीच त्यांच्या मुलाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.

एसपी बालसुब्रमण्यम यांना कामगिरीसाठी 6 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी 16 भाषांमध्ये जवळपास 40 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी सलमान खानसाठी अनेकदा गाणी गायली. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.