ड्रग्स प्रकरणात कलाकारांचे चॅट बाहेर कसे आले ? व्हॉट्सअ‍ॅपने दिले स्पष्टीकरण


अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर येत आहे. या लिक होणाऱ्या चॅटमुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एनसीबीला अथवा माध्यांना हे चॅट कसे सापडले असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यावर आता व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्टीकरण दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे म्हणणे आहे की, युजर्सचे मेसेज पुर्णपणे सुरक्षित असून, कोणत्याही तिसऱ्या व्यक्ती हे एक्सेस करू शकत नाही. म्हणजेच कोणतीही थर्ड पार्टी मेसेजपर्यंत पोहचू शकत नाही.

व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे की, व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या मेसेजला एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसोबत सुरक्षित ठेवते. जेणेकरून, तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात, तोच व्यक्ती केवळ मेसेज वाचू शकेल. मध्यभागी कोणीही हा मेसेज वाचू शकत नाही. कंपनी देखील हे मेसेज पाहू शकत नाही. युजर्स केवळ एक फोन नंबर वापरून व्हॉट्सअ‍ॅपवर साइन इन करत असतात व व्हॉट्सअ‍ॅप देखील युजर्सच्या मेसेजपर्यंत पोहचू शकत नाही.

कंपनीचे म्हणणे आहे की, ऑन-डिव्हाईस स्टोरेजसाठी व्हॉट्सअ‍ॅप ऑपरेटिंग सिस्टम निर्मात्यांद्वारे देण्यात आलेल्या निर्देशनांचे पालन करते. आम्ही लोकांना ऑपरेटिंग सिस्टमद्वारे देण्यात आलेल्या सुरक्षा उपाय जसे की पासवर्ड आणि बायोमॅट्रिक आयडीचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. जेणेकरून, थर्ट पार्टी युजर्सच्या डिव्हाईसमध्ये स्टोर कंटेंटपर्यंत पोहचणार नाही.

दरम्यान, अनेकांचे म्हणणे आहे की 2005 नंतर मोबाईल फोन क्लोनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मेसेज मिळवले जात आहेत.  क्लोन फोनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप चॅटला अ‍ॅक्सेस करता येते. गुगल ड्राईव्ह अथवा आयक्लाउडवरून हे चॅट मिळवले जाऊ शकते, जे एन्क्रिप्टेड नाही. मात्र हे बेकायदेशीर आहे.