नवीन वर्षात येणार कोरोनाची लस, या देशाचा दावा


जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील औषध शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे ट्रायल अंतिम टप्प्यात असून, या वर्षाखेर लस उपलब्ध होईल असा दावा केला आहे. आता चीनच्या एका कंपनीने देखील 2021 पर्यंत लस अमेरिकेसह जगभरातील देशांमध्ये वितरणासाठी तयार असेल, असा दावा केला आहे.

सिनोव्हॅकचे सीईओ यिन वेइदॉन्ग यांनी अमेरिकेत कोरोनावॅक्स लस विकण्यासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाला अर्ज केला आहे. वॅक्सिनचा मानवी ट्रायलचा तिसरा व अंतिम टप्पा सुरू आहे. यिन यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः ही लस टोचली आहे. यिन म्हणाले की, सुरुवातीला आमचा विचार चीन आणि वुहानसाठी लस तयार करण्याचा होता. मात्र जून-जुलैमध्ये आम्ही जगभरातील लोकांसाठी लस तयार करण्याचा निर्णय घेतला.

ते म्हणाले की, आमचे लक्ष्य जगभरात लस पुरवण्याचे असून, यात अमेरिका, यूरोपियन संघ आणि अन्य देशांचा समावेश आहे. अनेक देशातील कठोर नियमांमुळे चीनी लसीची विक्री थांबवली आहे. मात्र यिन यांना आशा आहे की नियमांमध्ये बदल करत सर्वांना लस देणे शक्य होईल.

सिनोव्हॅक ही सरकारी कंपनी सिनोफार्मसोबत मिळून लस तयार करणारी चीनमधील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. या लसीचे ब्राझील, तुर्कस्तान आणि इंडोनेशियामध्ये 24 हजार जणांवर ट्रायल सुरू आहे. कंपनीने जेथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत अशा देशांना ट्रायलसाठी निवडले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की पुढील वर्षी फेब्रुवारी, मार्चपर्यंत लसीच्या शेकडो कोटी डोसचे उत्पादन करणे शक्य आहे. अमेरिकेसह जगभरात 2021 च्या सुरुवातीला लसीचा पुरवठा सुरू होईल.