चीनची कबुली, गलवानमधील संघर्षात ठार झाले एवढे जवान


पुर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात 15 जूनला झालेल्या चीन-भारत जवानांच्या संघर्षात किती सैनिक मारले गेले याची माहिती चीनकडून आतापर्यंत देण्यात आली नव्हती. मात्र आता प्रथमच चीनने कबुली देत या संघर्षात आपले 5 सैनिक मारले गेल्याचे मान्य केले आहे. यात चीनी सैन्याच्या एका कमांडिंग अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. माल्डो येथील चर्चेत चीनने ही गोष्ट मान्य केली आहे. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

चीनने भलेही 5 सैनिक मारले गेल्याचा दावा केला असला तरीही अमेरिका आणि भारताच्या गुप्तचर एजेंसीनुसार या संघर्षात चीनचे कमीत कमी 40 जवान मारले गेले आहेत. सध्या पुर्व लडाखच्या देपसांग, पेंगोंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेकडे, पेट्रोलिंग प्वाइंड 17ए, रेजांग ला आणि रेचिन ला येथे दोन्ही देशांचे सैनिक समोरसमोर आहेत.

या संघर्षानंतर भारताने चीनला स्पष्ट केले होते की, धक्काबुक्की आणि झडप अशी कारवाई अजिबात सहन केली जाणार नाही.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की चीनला स्पष्ट करण्यात आले आहे की त्यांच्या सैनिकांकडून पारंपारिक शस्त्रांचा वापर केला गेल्यास, भारतीय सैनिक गोळीबार करण्यास देखील मागे पुढे पाहणार नाहीत. चर्चेदरम्यान, चीनने पेंगोंग सरोवराजवळील उंचीवरील भागातील सैन्य भारताने मागे घ्यावे असे चीनने म्हटले. यावर भारताने संपुर्ण पुर्व लडाख भागातील स्थितीचे निराकरण करण्याविषयी जोर दिला.