अरेच्चा! अचानक कोट्याधीश झाली 16 वर्षांची मुलगी, बँक खात्यात आले 10 कोटी रुपये

एखादी व्यक्ती रातोरात कोट्याधीश झाले असे आपण अनेकदा वाचत असतो. मात्र रातोरात कोट्याधीश होण्यासाठी त्या व्यक्तीने मागील अनेक वर्ष मेहनत घेतलेले असते किंवा त्याला लॉटरी तरी लागलेली असते. अचानक तुमच्या खात्यात कोट्यावधी आले असे होणे शक्य नाही. मात्र उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील रुकूनपुराव गावातील एक 16 वर्षीय मुलगी सरोज अचानक कोट्याधीश झाली आहे. तिच्या खात्यात अचानक 9 कोटी 99 लाख 4 हजार 736 रुपये आले. याची माहिती मिळताच तिचे कुटुंब देखील घाबरले.

सरोजचे अलाहाबाद बँकेच्या बासंडीह शाखेत खाते आहे. ती काहीतरी कामासाठी बँकेत गेली असता, तिला तिच्या खात्यात 9 कोटी 99 लाख रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली. यानंतर त्वरित तिच्या खात्यावरील व्यवहार रोखण्यात आले.

सरोजने सांगितले की, तिने हे खाते 2018 मध्ये उघडले होते. दोन वर्षांपुर्वी निलेश नावाच्या व्यक्तीने पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत मदत निधी मिळून देण्यासाठी आधार कार्ड आणि फोटो मागितला. त्यानंतर एटीएम आले. ते देखील निलेशने स्वतःकडे मागितले. बँकेने सांगितले की, खात्यातून अनेकदा व्यवहार झाले आहेत. मात्र सरोजने याची कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. निलेशशी ज्या नंबरवर बोलणे होत असे, तो देखील बंद आहे.

सरोजचे वडील अहमदाबादमध्ये गॅरेजमध्ये काम करतात. सरोज कधी शाळेत देखील गेली नाही. तिला केवळ सही करत येते. अचानक एवढे पैसे खात्यात जमा झाल्याने तिचे कुटुंब देखील घाबरले आहे.