भारतीय नौसेनेत दाखल होतोय हंटरचा नवा ताफा

फोटो साभार इकॉनॉमिक्स टाईम्स

ऑक्टोबर मध्ये भारतीय नौसेनेमध्ये सर्वात मोठे गस्ती आणि जासूसी विमान गणले जाणारे बोईंग पी ८ आयची नवी विमाने दाखल होत आहेत. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त अशी ही विमाने हंटर नावाने ओळखली जातात.

भारत चीन नियंत्रण रेषेवरील वाढता तणाव, त्याशिवाय चीन अरबी आणि हिंद महासागरात वाढवीत असलेले अस्तित्व, याचा फायदा घेऊन पाकिस्तान हिंद महासागरात करत असलेली घुसखोरी या कारवायांना सडेतोड उत्तर देण्यासाठी हंटर विमाने अतिशय उपयुक्त आहेत. या मुळे भारतीय सेनेचे बळ अनेक पटीने वाढणार आहे. बोईंग या अमेरिकन विमान कंपनीकडून हंटर खरेदीचा सौदा झाला होता त्यानुसार ही विमाने पुढील महिन्यात भारतीय सेनेत दाखल होत आहेत असे समजते.

बोईंगची पी ८ आय ही गस्ती विमाने चीनी पाणबुड्या आणि युद्धनौका क्षणात उध्वस्त करण्याची क्षमता असलेली विमाने आहेत. भारतीय नौदलाच्या सेवेत पूर्वीपासून या विमानांचा ताफा असून तमिळनाडूच्या अरकोन्नम बेसवर तैनात आहेत. अंदमान सागरावर बारीक नजर ठेवण्याचे काम ही विमाने करत असून चीनी पाणबुड्या आणि युद्धनौकांवर त्यांचे बारीक लक्ष आहे. नव्याने येत असलेली विमाने गोवा येथील हंसा नेव्हल बेसवर तैनात केली जाणार असून गरज पडल्यास ती पूर्व लडाख भागात पाठविली जातील असे समजते.

ही हंटर विमाने अत्याधुनिक रडार सह आहेत आणि अगदी बारीकशी घुसखोरी सुद्धा ती टिपू शकतात. सबमरीनची शिकार करण्यासाठी या विमानांवर मार्क ५४, टोरपेडो, मार्क ८४ डेप्थ चार्ज घातक बॉम्ब आहेत शिवाय एजीएम-८४ हर्पून अँटीशिप मिसाईल वाहून नेण्याची त्यांची क्षमता आहे. यामुळे पाण्याच्या आत लपलेल्या पाणबुड्या शोधण्यासाठी त्यावर मॅड नावाची सिस्टीम आहे. या विमानावरील रडार दुरवर नजर ठेऊ शकतात. या विमानांचा वेग ताशी ७८९ किमी असून ती ४० हजार फुटांवरून उड्डाण करू शकतात. या विमानाची रेंज १२०० किमी पर्यंत आहे.