दिपिकावर इंडस्ट्रीचे पणाला लागलेत ६०० कोटी

फोटो साभार डीएनए इंडिया

बॉलीवूड अमली पदार्थ लिंक मध्ये बॉलीवूड अभिनेत्री आणि सेलेब्रिटी दीपिका पदुकोणचे नाव आले असून उद्या म्हणजे शनिवारी तिची अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशी होणार आहे. यामुळे दीपिका सतत चर्चेत राहिली असून तिच्या करियरवर याचा काय परिणाम होईल याविषयी अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत.

दीपिकावर इंडस्ट्रीचे तब्बल ६०० कोटी रुपये गुंतविले गेले आहेत. त्यात दोन चित्रपट आणि ३३ ब्रांड एन्डोर्समेंटचा समावेश आहे. या दोन्ही चित्रपटांची नावे अद्यापी निश्चित झालेली नसली तरी त्यांचे बजेट प्रत्येकी २०० कोटी रुपयांचे आहे. ३३ ब्रांडचे ३०० कोटी दिपिकावर गुंतलेले आहेत. व्यवसाय विश्लेषक अतुल मोहन या संदर्भात म्हणाले, दीपिका प्रत्येक ब्रांड जाहिरातीसाठी ८ ते १२ कोटी रुपये घेते. मधू मंतेना महाभारतातील द्रौपदीवरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवीत आहेत त्यात दीपिका काम करणार आहे. हे मधू मंतेना सुद्धा ड्रग प्रकरणात अडकले आहेत.

गेली चाळीस वर्षे वितरक म्हणून काम करत असलेले राज बन्सल म्हणाले, या प्रकरणाचा दीपिकाच्या करियरवर परिणाम होईल हे नक्की आहे. ती सेलेब्रिटी असल्याने मिडिया तिच्या मागे हात धुवून लागणार. संजय दत्त जेव्हा अश्याच प्रकरणात अडकला होता त्यानंतर सुद्धा प्रेक्षकांनी त्याला स्वीकारले होते. त्यामुळे दीपिकाच्या चित्रपट करियरवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र ज्या उत्पादनांची ती ब्रांड अँम्बेसिडर आहे त्या कंपन्या मात्र तिच्याशी पुन्हा करार न करण्याची शक्यता अधिक आहे. येथे तिचे सर्वाधिक नुकसान होऊ शकेल. अर्थात अमली पदार्थ सेवन करणे हा शिक्षापात्र गुन्हा नाही त्यामुळे दीपिकाला तुरुंगवास होण्याची शक्यता नाही असेही ते म्हणाले.