पेप्सिकोने या राज्यातील प्लांट केला बंद, शेकडो बेरोजगार


पेप्सिकोने केरळच्या पलक्कड येथील आपला उत्पादन कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांद्वारे संप आणि वारंवार होणाऱ्या विरोध प्रदर्शनामुळे पेप्सिकोने हा कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जवळपास 500 लोक बेरोजगार झाले आहेत. 22 मार्चपासूनच कंपनीने हा कारखाना बंद ठेवला होता.

पलक्कडमध्ये पेप्सिकोचा कारखाना त्यांची फ्रेंचाइजी वरुण बेवरेजेज लिमिटेडद्वारे चालवला जात होता. अखेर कंपनीने राज्याच्या कामगार विभागाला कारखाना बंद करत असल्याची नोटीस दिली.

या कारखान्यातील कामगार मागील वर्षी डिसेंबरपासूनच संप करत होते. यात विविध पक्षांच्या कामगार संघटना होत्या. या संघटनांची मागणी होती की कंत्राटी कामगारांना चांगल्या सुविधा आणि पगारवाढ द्यावी. त्यांच्या या मागणीवर कंपनीने एक वर्षापासून कोणताही निर्णय घेतला नव्हता. या मागण्यांसाठी 110 नियमित कर्मचारी आणि 280 कंत्राटी कामगार संप करत होते. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता.

या कारखान्याची स्थापना 2000 साली करण्यात आली होती. यात पेप्सी बँडचे पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि सॉफ्ट ड्रिंगचे उत्पादन केले जात असे. कर्मचाऱ्यांच्या मागणीमुळे कंपनीने 2019 साली कारखान्याची जबाबदारी बॉटलिंग पार्टनर वरुण बेवरेजला सोपवली होती.