‘गरीबांचे शोषण मित्रांचे पोषण, हेच आहे मोदींचे शासन’, राहुल गांधींचा हल्लाबोल


संसदेचे पावसाळी अधिवेशन कोरोना संकटामुळे वेळेआधीच गुंडाळण्यात आले. अवघ्या काही दिवसांमध्येच अनेक विधेयकांना मंजूरी देण्यता आली. कृषी विधेयकांना विरोध होत असताना, सरकार मंजूर केलेल्या कामगार विधेयकाबाबत देखील कामगार संघटनांमध्ये विरोध पाहण्यास मिळत आहे. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका करत ट्विट केले की, शेतकऱ्यांनंतर आता कामगारांवर वार, गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण, हेच आहे मोदींचे शासन.

राज्यसभेत काल 3 प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी देण्यात आलेली आहे. या नवीन कामगार कायद्यामुळे देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना अनेक सुविधा मिळतील. मात्र या विधेयकांतर्गत ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या 300 पेक्षा कमी आहे, ते विना सरकारची परवानगी घेता कामगार कपात करू शकतात. आतापर्यंत 100 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपनीसाठीच हा नियम होता. याच निर्णयाला कामगार संघटना आणि राजकीय पक्ष विरोध करत आहेत. याशिवाय आता कर्मचारी 60 दिवस आधी नोटीस दिल्याशिवाय संप करू शकणार नाहीत.