आता गुगल मॅप सांगणार तुमच्या भागात कोठे आहेत कोरोनाचे रुग्ण


कोव्हिड-19 च्या लढाईत गुगल आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत आहे. आता कंपनी गुगल मॅपमध्ये कोव्हिड लेयर नावाचे एक नवीन फीचर आणणार आहे. गुगलचा दावा आहे की या फीचरद्वारे युजर ज्या भागात प्रवास करेल, तेथील कोरोनाच्या स्थितीबाबत माहिती मिळेल. म्हणजेच त्या भागात किती कोरोनाग्रस्त आहेत याची माहिती मिळेल.

गुगलने हे फीचर कधी रोल आउट होणार आहे याची अद्याप माहिती दिलेली नाही. या नवीन फीचरबाबत कंपनीने ट्विट करत दिली आहे. अँड्राईड आणि आयओएस युजर्सला लवकरच गुगल मॅपसाठी नवीन अपडेट मिळण्याची शक्यता आहे.

गुगलने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये माहिती दिली की, आता गुगल मॅपवर उघडल्यावर युजरला लेअर बटनमध्ये कोव्हिड-19 इंफो फीचर मिळेल. या फीचरवर गेल्यावर युजर ज्या भागात आहेत तेथील कोरोनाची आकडेवारी दिसेल. हा सात दिवसांमधील सरासरी आकडा असेल व रुग्ण संख्या वाढली आहे की कमी झाली आहे याची माहिती दिसेल. गुगल यात कलर कोडिंग फीचर देखील देणार आहे.

गुगल जॉन्स हॉपकिन्स, न्यूयॉर्क टाईम्स आणि विकिपिडिया सारख्या विविध स्त्रोतातून एका विशिष्ट क्षेत्रातील डेटा एकत्र करेल.