धक्कादायक! 2 मास्कसाठी खाजगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णाला आकारले 20 हजार रुपये


कोरोना महामारी संकटाच्या काळात खाजगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांकडून भरमसाठ पैसे उकळत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली असून, हॉस्पिटलने मास्क, सॅनिटायझर, कॅप आणि ग्लव्सच्या नावाखाली 20 हजार रुपये वसूल केले. याबाबत रुग्णाने मेडिकल नेग्लिजेंसी बोर्डमध्ये तक्रार दाखल केली आहे.  गुडगाव येथील खाजगी हॉस्पिटलने हे अतिरिक्त शुल्क आकारले आहेत.

शुभम पटेलने सांगितले की, तो मारुती कंपनीमध्ये ट्रेनिंगसाठी आला होता. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर तो चाचणीसाठी 7 सप्टेंबरला साउथ सिटी-1 येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला. चाचणी केली असता रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर 7 दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले व 14 सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र 7 दिवसांच्या उपचाराचे तब्बल 191,202 रुपये बिल त्याला सोपवण्यात आले. आरोग्य विम्यातून त्याने 1,48,763 रुपये भरले. मात्र उर्वरित 30,864 भरण्यासाठी हॉस्पिटलकडून दबाव टाकण्यात आला. एवढे बिल कशाचे आकारले याची देखील माहिती देण्यात आली नाही.

शुभमने सांगितले की, त्याने मित्राकडून उधारी घेत बिलाचे पैसे भरले. बिलात केवळ मास्क, सॅनिटायझर, कॅप आणि ग्लव्सच्या नावाखाली 20 हजार रुपये लावले होते. तर त्याला 7 दिवसात केवळ 2 वेळाच मास्क देण्यात आला होता. ज्या वस्तू दिल्याच नाही त्याचे देखील पैसे आकारण्यात आले.

शुभमने याबाबत सिव्हिल सर्जन ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली. सिव्हिल सर्जन डॉक्टर विरेंद्र यादव यांनी सांगितले की, याबाबत तक्रार मिळाली. मात्र ही अतिरिक्त शुल्काची तक्रार आहे. याबाबत पोलिसात तक्रार देणे गरजेचे आहे.